छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, होंडा सिटी कारसह तीन आरोपींना सिडको एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी (दि.१०) मध्यरात्री बाराच्या सुमारास केंब्रिज चौकातून जेरबंद केले.
शुभम संजय सोमासे (२५, रा. भेंडा फॅक्टरीजवळ, नेवासा, जि. अहिल्यानगर), अशोक विष्णू आढरे (३९, रा. नादुब शिकरी, ता. नेवासा) आणि अजय शिवाजी मगर (२६, रा. कुकाणा, ता. नेवासा) अशी
आरोपींची नावे आहेत. यापैकी शुभम सोमासे आणि अजय मगर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. जालना रोडवरील केंब्रिज चौकात तीन आरोपी आपसात भांडणे करीत असून, त्यांच्याकडे गावठी कट्टा व जिवंत काडतुसे असल्याची माहिती सहायक फौजदार दशरथ जाधव यांना पेट्रोलिंग करताना गुप्त बातमीदाराकडून समजली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना दिली.
जाधव यांनी विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक भारत पाचोळे यांच्या पथकास घटनास्थळी पाठविले.
गावठी पिस्टल आणले कोठून?
पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता, शुभम संजय सोमासे याच्याकडून एका गावठी पिस्टलसह तीन जिवंत काडतुसे जप्त केली. होंडा सिटी कारसह पोलिसांनी ५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी गावठी पिस्टल कोठून आणले याचा तपास सहायक फौजदार लखनसिंह पचलोरे करीत आहेत.











